“सुशांतचं ‘ब्रह्मास्त्र’ संपूर्ण इंडस्ट्रीला…” बहीण मीतू सिंहची बॉलिवूडकरांवर टीका
ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनानंतर सुशांतच्या बहीणीने पुन्हा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सुशांतचे कुटुंब, मित्र आणि त्याचे चाहते यांच्या आठवणीत तो अद्यापही जिवंत आहे. सोशल मीडियावर सुशांतला न्याय मिळावा याची मागणी चाहते सातत्याने करताना दिसतात. सुशांतच्या मृत्यूसाठी, त्याचे कुटुंब आणि चाहते बॉलिवूडमधील भेदभाव आणि घराणेशाहीला जबाबदार धरतात. आता बऱ्याच दिवसांनंतर सुशांतची मोठी बहीण मीतू सिंह पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली असून तिने ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीतील लोकांवर टीका केली आहे.
बॉलिवूडमधील कोणाचेही नाव न घेता सुशांतचा फोटो शेअर करताना मीतू सिंहने लिहिलं, “सुशांतचे ब्रह्मास्त्र या बॉलिवूड इंडस्ट्रीला उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसे आहे. बॉलिवूडला नेहमीच लोकांवर राज्य करायचे आहे, एकमेकांचा आदर आणि विनम्रतेमध्ये कधीही कमी पडू देऊ नका.” मीतूने पुढे लिहिले की, “अशाप्रकारच्या नैतिक मूल्यांनी समृद्ध अशा लोकांना आपण आपल्या देशाचा चेहरा कसा बनवू शकतो? नाटक करून जनतेची मने जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न व्यर्थ गेला आहे. गुणवत्ता आणि नैतिक मूल्ये या एकमेव गोष्टी आहेत ज्यामुळे प्रशंसा आणि आदर मिळू शकतो.”
मीतू सिंहच्या आधी काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही सुशांतसिंह राजपूतसह एक जुना फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत विवेक यांनी लिहिलं होतं, “सुशांतसिंह राजपूतची आठवण येत आहे. मी त्याच ठिकाणी आहे जिथे आम्ही अनेक संध्याकाळ एकत्र घालवल्या. इथे आम्ही जीवन आणि इतर अनेक विषयांवर बोलायचो. आम्ही शेखर कपूरच्या ‘पानी’ या चित्रपटाबद्दल बोलायचो. तसेच मध्यमवर्गीय आणि छोट्या शहरातील लोकांच्या बॉलिवूडमधील संघर्षांवर चर्चा करायचो.”
दरम्यान सुशांतसिंह राजपूत १४ जून २०२० रोजी त्याच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी तपासात ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र, सुशांतच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. याप्रकरणी सीबीआय अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. दुसरीकडे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने देखील या प्रकरणात ड्रग्जच्या अनुशंगाने तपास केला होता आणि सुशांतची मैत्रीण असलेल्या रिया चक्रवर्तीसह अनेक लोकांवर सुशांतला ड्रग्ज पुरवल्याचा आरोप आहे. हे आरोपीही काही दिवस तुरुंगात होते.